मूल शहरातील समस्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपरिषद ला निवेदन

136

मूल शहरातील समस्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपरिषद ला निवेदन

समस्या तात्काळ सोडविण्यासाठी मुख्याधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – आकाश येसनकर

मूल:
मूल शहरातील वॉर्ड क्रमांक 15 आणि 16 मधील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला असून, नगरपरिषदेने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. पाणी, लाईट आणि प्रकाश व्यवस्थेसारख्या मूलभूत सुविधांवर दुर्लक्ष होण्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वॉर्ड क्रमांक 16 मधील हनुमान मंदिराजवळील सार्वजनिक संडास हे अनेकांसाठी आवश्यक आहे. मात्र, पाण्याची व लाईटची सोय नसल्यामुळे संडास वापरणे कठीण बनले आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्य समस्याही निर्माण होण्याचा धोका आहे. या परिस्थितीत सुधारणा करून पाणी आणि लाईटच्या सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी राष्ट्रवादी काँग्रेसने ठाम मागणी केली आहे.

तसेच, वॉर्ड क्रमांक 15 मधील बाल विकास शाळा परिसरातील प्रकाश व्यवस्थेचा अभाव हा विद्यार्थी आणि नागरिकांसाठी अडचण निर्माण करत आहे. सौर उर्जेवर आधारित पथदिवे बसवून हा परिसर प्रकाशमान करण्यात यावा, असा पर्यावरणपूरक प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदेसमोर मांडला आहे.

“नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी या समस्या सोडवणे महत्त्वाचे आहे. नगरपरिषदेकडून त्वरित कार्यवाही होणे अपेक्षित आहे,” अन्यथा आम्हाला पुढचे पाऊल उचलावे लागेल असा इशारा शहर अध्यक्ष आकाश येसनकर यांनी दिला आहे.
निवेदन देताना राहुल बघमारे,मायाबाई टेकाम, जयश्री सोयाम, अनुसया कोडापे,काजल गाजेवार, गणूबाई मट्टे,शालू मडावी आदी उपस्थित होते.